पुणे, 25 जुलै : पुण्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलेले आहे. तसेच रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय. पुण्यात मुसळधार पाऊस होत असताना अंडा भुर्जीच्या गाडीवर आवराआवरी व ती सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुण्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी –
पुण्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता या भागांतील शाळा गुरुवारी (दि.25 जुलै) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पुण्यात तिघांचा मृत्यू –
पुण्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरूप आले आहे. असे असताना पुण्यात अंडा भुर्जीच्या गाडीवर आवराआवरी व ती सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथे आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. अभिषेक अजय घाणेकर (वय 25, रा. पुलाच्या वाडी डेक्कन), आकाश विनायक माने (वय 21, रा. पूलाची वाडी डेक्कन, शिवा जिदबहादुर परिहार (वय 18, नेपाळी कामगार) अशी मृत तरूणांची नावे आहेत.
जळगावचा हवामान अंदाज –
जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागात काल पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांची शेतीकामासाठी लगबग सुरू असताना काल संततधार पाऊस बघायला मिळाला. दरम्यान, आज जिल्यातील काही भागात ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.