चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 22 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर संपुर्ण राज्याचे लक्ष हे निकालाकडे लागले आहे. राज्यात सर्वच मतदारसंघात उद्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, पाचोरा भडगाव मतदारसंघाची मोजणी पाचोरा शहरातील गिरड रोड परिसरातील महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ एमआयडीसी गोडाऊन येथे होणार आहे. राज्यातील लक्षवेधी ठरणाऱ्या पाचोरा मतदारसंघात जो कोणी उमेदवार निवडून येणार तो रेकॉर्ड बनवणार आहे.
किशोर आप्पांची हॅट्रीक झाली तर…..
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील हे गेल्या 10 वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. दरम्यान, तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास केला असल्याचा दावा त्यांच्याकडून सातत्याने करण्यात आला आहे. खरंतर, 1962 पासूनच्या पाचोरा मतदारसंघाच्या इतिहासात एकाही उमेदवाराला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवता आलेला नाहीये. विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील हे जर विजयी झाले तर ते हॅट्रीक करण्याचा रेकॉर्ड करणार आहेत. यामुळे त्यांची हॅट्रीक होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वैशालीताईंनी जर विजय मिळवला तर….
गेल्या अडीच वर्षांपुर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेत दोन गट पडले. यावेळी स्व. आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला साथ दिली. यानंतर त्या मतदारसंघात सातत्याने संघटनेच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केलेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत त्यांची पाचोऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने वैशालीताई सुर्यवंशी ह्या पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक लढवत आहेत. खरंतर, आतापर्यंतच्या इतिहासात एका प्रमुख पक्षाकडून महिला उमेदवाराला याठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच पाचोरा मतदारसंघात 1962 पासून ते आतापर्यंत एकाही महिला आमदार म्हणून निवडून येण्याची संधी प्राप्त झालेली नाही. म्हणून वैशालीताई सुर्यवंशी ह्या जर निवडून आल्या तर पाचोरा-भडगावच्या पहिल्या महिला आमदार म्हणून त्यांना इतिहास रचण्याची संधी आहे.
अमोल शिंदे जर निवडून आले तर….
विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपात पाचोरा भडगाव मतदारसंघ हा शिवसेनेच्याच वाटेला आल्याने भाजपचे अमोल शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी करत पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मागच्या निवडणुकीत अमोल शिंदे यांचा कमी मतांनी पराभव झाला होता. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात त्यांनी केलेल्या प्रचारादरम्यान त्यांना मोठा प्रतिसादही मिळाल्याचे पाहायला मिळाले. असे असताना अमोल शिंदे यांनी जर अपक्ष आमदार म्हणून विजय मिळवला तर अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान अमोल शिंदे यांना मिळू शकतो.
‘या’ उमेदवारांची भूमिका महत्वाची –
प्रतापराव हरी पाटील हे महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून तर माजी आमदार दिलीप वाघ आणि डॉ. निलकंठ पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. यंदाच्या निवडणुकीत या उमेदवारांची देखील महत्वाची भूमिका राहिलेली आहे. या उमेदवारांचा नेमका कोणाला फटका बसू शकतो, हे देखील उद्याच्या निकालनंतर स्पष्ठ होणार आहे.
हेही वाचा : किशोर आप्पा पाटील यांची हॅट्रिक होणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार? ‘असा’ आहे 1962 पासूनचा इतिहास