इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा-भडगाव सी.सी. आय मार्फत गजानन जिनिंग & प्रेसिंग फॅक्टरी गिरड रोड पाचोरा येथे कापूस खरेदी सुरू आहे. सदर खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची आवक होत आहे, अशी माहिती पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील यांनी दिली.
शेतकरी बांधवांनी कापुस विक्रीसाठी आपली ऑनलाईन नांव नोंदणी सी.सी. आय खरेदी केंद्र गजानन जिनिंग आणि प्रेसिंग गिरड रोड पाचोरा येथे प्रथम करावी. सदर नांव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी चालू पिक पेरा असलेला कापुस 7/12 उतारा, आधार कार्ड, बँकच्या पास बुकची पहिल्या पानाची स्पष्ट झेरॉक्स प्रत या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. तसेच शेतकरी स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे.
तसेच एक एकरला 12 क्विंटल कापसाची नोंद होईल. नाव नोंदणी झाल्यानंतर आपला कापुस टप्प्याटप्याने आणावा. कारण की, सदर खरेदी केंद्रावर दररोज 60 ते 65 वाहनांचे मोजमाप होत आहे. त्याअनुषंगाने आपली वाहने सी.सी. आय केंद्रावर संपर्क करून कापुस विक्रीसाठी आणावीत व गिरड रोड कडील रस्त्यावरच आपली वाहने लावावीत. यामुळे आपला वेळ व खर्च वाचेल.
तसेच दर शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टी असल्याने व शासनाच्या सर्व सुट्यांच्या दिवशी खरेदी केंद्र बंद राहील, असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.