नागपूर : गेल्या काही अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 26 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका पती पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली.
नागपूर शहरतील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिन नगर परिसरात ही घटना घडली. जेरील मनक्रीप आणि ऍनी मनक्रीप असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी दाम्पत्यानं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने ही घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.
सोमवारी जेरील मनक्रीप आणि ऐनी मनक्रीप यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर रात्री त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तो व्हिडिओ स्वतःच्या व्हाट्सएपच्या स्टेटसला ठेऊन आत्महत्या केली. ऐनीनं वेडिंग गाऊनमध्येच आत्महत्या केली.
पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जरीपटका पोलीस ठाण्यात साधारण साडेसात वाजता माहिती प्राप्त झाली की, मार्टिन नगरमध्ये पती पत्नीने आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मी स्वत: तिथे घटनास्थळी गेलो असता पती पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. पत्नीने लग्नाचा ड्रेस घातला होता. पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला असता पोलिसांना सुसाईड नोट आढळली. त्यामध्ये त्यांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, नातेवाईकांनी आम्हाला एक व्हिडिओ दाखवला की, त्यामध्ये दोन्ही पती पत्नीने व्हिडिओ बनवला की आम्ही परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत आहोत. तो व्हिडिओ त्यांनी स्टेटसवर पोस्ट केला होता. त्यानंतर घरात त्यांचा मोबाईल पाहिला असता, त्यात तो व्हिडिओ दिसला. हा व्हिडिओ त्यांनी 5 वाजून 43 मिनिटांनी बनवला होता.
त्यानंतर 5 वाजून 47 मिनिटांनी त्यांनी तो स्टेटसवर अपलोड केल्याचे आम्हाला दिसून आले. नातेवाईकांकडे याबाबत अधिक चौकशी केली असता या दाम्पत्याचे 26 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यांना मूलबाळ वगैरे काही नाही. तसेच मागील 4-5 वर्षांपासून ते पतीला कामधंदा वगैरे काही नव्हता. ते अशिक्षित होते. तसेच शेफचे काम करायचे. त्यामुळे परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली, असे प्राथमिक परिस्थितीवरुन दिसून येत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.