जळगाव, 7 सप्टेंबर : ई-पीक पाहणी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदीसाठी ई- पीक पाहणी व्हर्जन 2 हे अद्यावत अॅप्लीकेशन – गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
क्षेत्रीयस्तरावरून प्रत्यक्ष पिकांची आकडेवारी संकलीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांना देय असणा-या विविध योजनांच्या थेट लाभासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पीककर्ज, पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती मधील नुकसान, आधारभूत किंमत धान्य योजना इत्यादीची अंमलबजावणी सुलभ होणार आहे.
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी व्हर्जन 2 या अॅपद्वारे खरीप हंगामातील पीक पाहणी दिनांक 15/10/2024 पर्यत नोंदविणे आवश्यक आहे. सदर ई-पिक पाहणी न नोंदविल्यास शेतक-यांना शासकीय योजना/अनुदान मिळण्यास अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणी नोंदवावी तसेच ई-पीक पाहणी नोंदविण्यास काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याबाबत संबधित गावांचे तलाठी व कोतवाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
हेही वाचा : नार-पार गिरणा नदीजोडसाठी मंत्रीमंडळाने दिली प्रशासकीय मान्यता, आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी?