सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 27 फेब्रुवारी : पारोळा तालुक्यातील काही गावांमध्ये काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागात भेट देत पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला महत्वाच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा तालुक्यातील मोंढाळे या गावी भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यापूर्वी आज सकाळीच पारोळा तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी विविध प्रक्षेत्रांत भेटी देऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे क्षेत्रीय कर्मचारी यांच्याकडून सुरु करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची माहिती –
अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे काल रात्री जिल्ह्यात अनेक तालुक्यात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ती माहिती खालीलप्रमाणे –
- पारोळा तालुका मोंढाळे भागात गारपीट होऊन शेती पिकाचे नुकसान झाले आहे.
- अमळनेर तालुका गारपीट शेती पिकाचे नुकसान.
- धरणगाव वादळ वारा नुकसान नाही.
- एरंडोल मौजे आडगाव तुरळक पाऊस नुकसान नाही.
- चाळीसगाव गारपीट अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाचे कमी अधिक प्रमाणात नुकसान.