बेंगळुरू, 17 एप्रिल : इंडियन अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स डेंटिस्ट्री (IASD) च्या प्रतिष्ठित स्पोर्ट्स डेंटिस्ट्री फेलोशिपचा पदवीप्रदान समारंभ आज भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), बंगलोर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समारंभाला संबोधित करताना रक्षा खडसे यांनी डेंटिस्ट्री आणि क्रीडा विज्ञान यामधील दुवा निर्माण करणाऱ्या IASD च्या उपक्रमाचे कौतुक केले. खेळाडूंच्या सर्वांगीण विकासामध्ये तोंडाच्या आरोग्याचे वाढते महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि क्रीडा क्षेत्रात सहाय्यक आरोग्य विज्ञानांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. स्पोर्ट्स डेंटिस्ट्री हे एक उदयोन्मुख क्षेत्र असून खेळाडूंच्या आरोग्य आणि कामगिरी सुधारण्यात याची मोठी भूमिका आहे, असे यावेळी त्यांनी नमूद केले.
इंडियन अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स डेंटिस्ट्री (IASD) द्वारे सुरू करण्यात आलेली ही फेलोशिप इन स्पोर्ट्स डेंटिस्ट्री ही एक विशेष शैक्षणिक योजना असून, ती दंतचिकित्सकांना खेळाडूंच्या विशेष दंत आरोग्यविषयक गरजांबाबत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राबवली जाते. समारंभादरम्यान, यशस्वी फेलोंना पदवीप्रदान प्रमाणपत्रे देण्यात आली, ज्यामुळे भारतात क्रीडा आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला.
इंडियन अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स डेंटिस्ट्री (IASD) चे महासचिव डॉ.अशोक ढोबळे यांनी उपस्थितांचे स्वागत करत स्पोर्ट्स डेंटिस्ट्री क्षेत्राचा विकास घडवण्याच्या अकॅडमीच्या दृष्टीकोनाची माहिती दिली. श्रीमती खडसे यांचे मनःपूर्वक आभार मानून, त्यांच्या उपस्थितीमुळे आणि प्रोत्साहनामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या समारंभाला डॉ. जयकारा शेट्टी एम (कुलगुरू, बेंगळुरू विद्यापीठ), विष्णू सुधाकरण (प्रादेशिक संचालक, SAI, बेंगळुरू), डॉ. प्रलय मजुमदार (सल्लागार, क्रीडा विज्ञान शिक्षण व संशोधन, IIT-मद्रास), डॉ. रीना कुमार (शैक्षणिक संचालक, IASD-IDA), डॉ. अतुल सुर्वे (रेजिस्ट्रार, IASD-IDA) तसेच क्रीडा, दंतचिकित्सा व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि SAI चे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिका ठार; यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारातील घटना