मुक्ताईनगर : जर मंत्री, खासदाराच्या मुलीसोबत अशी घटना घडू शकते तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही, या शब्दात मंत्री रक्षा खडसे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चारही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, जर या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर हे किती दुर्दैव म्हणावं. आज या लोकांना माहिती आहे ही माझी मुलगी आहे, म्हणजे एक मंत्री म्हणून, एक खासदाराच्या मुलीसोबत घडू शकतं तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही, या शब्दात मंत्री रक्षा खडसे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ही घटना माहिती पडल्यावर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या. त्यावेळी मलाही वाटलं की, आमचंही कुठे ना कुठे चुकतं की आम्ही या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्या मुलीनेही मला सांगितलं की, आम्ही शाळेत जातो तेव्हाही असेच प्रकार त्यांच्यासोबत घडतात. हे एक पाच-सहा मुलांची टोळी आहे. त्यामुळे या टोळीला कठीण शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आज पोलीस स्टेशनला मी माझे पत्र दिलेले आहे आणि आजच्या आज मी या सर्व लोकांना अरेस्ट करायला लावणार आहे. मुख्यमंत्री महोदयांशीही मी याबाबत बोलली आहे. आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही तर सर्व मुक्ताईनगर तालुक्यात राहणाऱ्या महिला, मुलींचा प्रश्न आहे. कारण कुणी कुठेही फिरू शकतं, आज इतकं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण जर फिरायच्या वेळेस अशा घटना घडत असतील तर अतिशय दुर्दैव आहे. अशा प्रृवत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी केली.
हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..