जळगाव, 16 सप्टेंबर : हवामान विभागाने जळगाव जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा दिला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान, तापीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने तापी नदीकाठच्या या गावांमध्ये जळगाव जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट –
अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टा निर्माण झाल्याने हे क्षेत्र आता पूर्व मध्यप्रदेश आणि लगतच्या भागावर आहे. मध्य प्रदेशमधून कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणपर्यंत तयार झाला असून त्यामुळे हवामान विभागाने आज शनिवारी १६ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
धरण क्षेत्रामध्ये पाणी वाढले –
हतनूर धरणाचे 41 पैकी 4 गेट पुर्ण व 32 गेट 1.50 मीटर उघण्यात आलेले आहेत. तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 179895 क्यूसेक इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत 200000 ते 250000 क्यूसेक पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असताना लोकांना नदीत किंवा घाटाजवळ न जाण्याचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
हवामान विभागाकडून मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात.
जिल्ह्यात संततधार पाऊस –
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भुसावळसह अनेक तालुक्यांमध्ये दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तसेच पावसामुळे हवेत आता गारवा निर्माण झाल्याने बळीराजाही सुखावला आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.