जळगाव, 19 जुलै: महाराष्ट्रात मागील काही दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील पाच दिवस राज्यभरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि अरबी समुद्रातील वेगवान वारे यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान अंदाज नेमका काय? –
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा जोर राहील. पुणे आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट –
राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. यानुसार, आज रविवारी (१९ जुलै) पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून या सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय?-
गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा खंड पडल्याचे दिसून येत आहे. तसेच शेतकऱ्यांकडून दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसांचा जळगावचा अंदाज खालीलप्रमाणे असेल:
- १९ जुलै (रविवार): जळगावात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारनंतर किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या एक-दोन हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.
- २० जुलै (सोमवार): उद्या सोमवार रोजी जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहील आणि दिवसभरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
दमदार पावसाची प्रतिक्षा –
गेल्या दीड महिन्यापासून राज्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. अनेक भागांत तर मागील काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याचे चित्र आहे. यामुळे खरीप पिकांची पेरणी केलेले शेतकरी चिंतेत दिसून येत असून काही ठिकाणी पिके कोमेजू लागली आहेत. मात्र, आता पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याने दमदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी






