मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत जनहिताच्या दृष्टीने 8 निर्णय घेण्यात आले. सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता बैठकीत देण्यात आली. यासोबतच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात असलेल्या वरखेडे लोंढे (बॅरेज) या मध्यम प्रकल्पाच्या 1 हजार 275 कोटी 78 लाख रुपयांच्या सुधारित तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी 1 हजार 275 कोटी 78 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत गिरणा नदीवर मौजे वरखेडे बु. येथे आहे. या प्रकल्पाचा पाणीसाठा 35.587 द.ल.घ.मी इतका असून, उपयुक्त पाणीसाठा 34.772 दलघमी इतका असेल.
वरखेडे-लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी पारंपरिक स्वरूपाचा खुला कालवा प्रस्तावित होता. मात्र, पाणी गळतीचे प्रमाण लक्षात घेता 2022 मध्ये या प्रकल्पाच्या विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी या प्रकल्पाच्या कामाला चालना मिळालेली नव्हती. मात्र, राज्य मंत्रीमंडळाने मंगळवारी सुधारित प्रशासकीय मान्यता देत या प्रकल्पासाठी 1 हजार 275 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या बॅरेज प्रकल्पामुळे चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील 8 हजार 290 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.