मुंबई, 15 जुलै : राज्यात अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक होऊनही आरोपी जामिनावर सुटतात. अशा प्रकरणांमध्ये ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मोक्का) लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य विलास भुमरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस –
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या एनडीपीएस अंतर्गत सर्व गुन्ह्यांमध्ये मोक्का लावणे शक्य होत नाही. मात्र, या सभागृहाने मंजुरी दिलेली असून, वरील सभागृहातही एक ते दोन दिवसांत मान्यता मिळेल. त्यानंतर वारंवार अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत कठोर कारवाई करता येणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थ विरोधात मोहिम सुरू असून छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधात मोठ्या प्रमाणात धडक कारवाई सुरु आहे, अँटी-नार्कोटिक्स युनिट प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून कारवाया गतिमान झाल्या असून, विशेषतः शाळा संपर्क अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे.
गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमधील ३७९ ते ३८९ शाळांना भेटी देण्यात आल्या असून, २५७ कार्यशाळांद्वारे अमली पदार्थविरोधी जनजागृती करण्यात आली आहे. बेहराम पाडा यासारख्या संवेदनशील भागांमध्ये धडक मोहिमा राबवण्यात येतील.अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. परदेशी नागरिक येथे येऊन गुन्हे करून निकाल लागेपर्यंत राहतात, त्यांची कारवाई रखडते. याबाबत केंद्र शासनाशी चर्चा सुरू असून, लघु गुन्ह्यांमध्ये केस परत घेऊन तत्काळ रिपोर्ट करून आरोपींचे ‘डिपोर्टेशन’ करता येईल, यासाठी प्रभावीत कार्यप्रणाली तयार केली जात आहे.
अमली पदार्थ विक्री प्रकरणांमध्ये अनेकदा आरोपी आपले वय कमी असल्याचे दाखवतात. याचा गैरफायदा रोखण्यासाठी व कायद्याच्या ‘कमी वयाच्या अज्ञान’ नियमात सुधारणा करून, जसे बलात्कार प्रकरणांमध्ये गुन्ह्याचे स्वरूप पाहून निर्णय घेतला जातो, तसेच पद्धतीने दोषींचे वय दोन वर्षांनी खाली आणण्याबाबत विचार सुरू आहे. राज्यात अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध विशेष मोहीमा, ड्रग्ज मुक्त अभियान सुरू आहे. नार्कोकोऑर्डीनेशन यंत्रणेची पुनर्रचना करण्यात आली असून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात अमली पदार्थाच्या व्यापारास व प्रसारास आळा घालण्यासाठी सर्व पोलीस घटकामध्ये स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या लक्षवेधी सूचनेत विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई यांनी सहभाग घेतला.