नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 75 व्या वर्षी निवृत्तीबाबत एक महत्त्वाचे भाष्य केले आहे. मी कधीही असे म्हटले नाही की मी निवृत्त होईन किंवा कोणीही निवृत्त व्हावे. संघात, आम्हाला स्वयंसेवकांना काम दिले जाते… आम्हाला ते हवे असो वा नसो… जरी मी 80 वर्षांचा झालो आणि संघाने मला म्हटले की जा आणि शाखा लावा, तर मला जावे लागेल, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
नेमकं काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, मी असे बोललो नाही की, मी किंवा कुणी 75 व्या वर्षी निवृत्त व्हावे. संघात जे सांगितले जाते, तेच करावे लागते. जोपर्यंत 75 वर्षांचा विषय आहे तर मी मोरोपंत जी यांचा विषय काढला होता, ते एक विनोदी व्यक्ती होते. जेव्हा ते 75 वर्षांचे झाले तेव्हा आमचा एक कार्यक्रम होता… ते असे काहीतरी बोलायचे की लोक खूप हसायचे. आमचे सहकारी शेषाद्रीजींनी त्यांना एक शाल दिली आणि काहीतरी बोलण्यास सांगितले, मग ते म्हणाले की आता ती शाल तुम्हाला देण्यात आली आहे, याचा अर्थ तुम्ही 75 वर्षांचे झाला आहात आणि इतरांसाठी मार्ग सोडा…’
सरसंघचालक भागवत पुढे म्हणाले की, ‘मी कधीही असे म्हटले नाही की मी निवृत्त होईन किंवा कोणीही निवृत्त व्हावे. संघात, आम्हाला स्वयंसेवकांना काम दिले जाते… आम्हाला ते हवे असो वा नसो… जरी मी 80 वर्षांचा झालो आणि संघाने मला म्हटले की जा आणि शाखा लावा, तर मला जावे लागेल. मी 75 वर्षांचा झालो आहे, मला निवृत्तीचा आनंद घ्यायचा आहे, असे मी नाही म्हणू शकत. येथे निवृत्तीचा कोणताही लाभ नाही… संघ जे सांगतो ते आम्ही करतो… आम्ही असे म्हणू शकत नाही की मी हे करेन, मी हे करणार नाही… म्हणून ते कोणाच्याही निवृत्तीबद्दल किंवा माझ्या निवृत्तीबद्दल नाही… आम्ही कधीही निवृत्त होण्यास तयार आहोत… आणि जोपर्यंत संघाची इच्छा असेल तोपर्यंत आम्ही काम करण्यास तयार आहोत’.
दरम्यान, भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन्ही पुढच्या महिन्यात 75 वर्षांचे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केल्यानंतर आता दुसऱ्या व्यक्तीला पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवावी, अशी संघाची इच्छा असल्याचे अनेकांना वाटत होते. मात्र, आता मोहन भागवत यांच्या विधानानंतर अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळे आता संघाने 2029 साठीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला हिरवा कंदीलही दिला असल्याचे बोलले जात आहे.
2029 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्त्व?
देशात पुढची लोकसभेची निवडणूक ही 2029 मध्ये होणार आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 79 वर्षांचे होतील. आता भागवत यांनी 80 वर्षांहून अधिक वयानंतरही संघाच्या इशाऱ्यानुसार काम करत राहण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे जर संघाची इच्छा असेल तर पंतप्रधान मोदी त्यानंतरही भाजप सरकारचे नेतृत्व करू शकतात. अशाप्रकारे, संघाच्या दृष्टीने, जे नेते काम करत राहण्यास सक्षम आहेत त्यांच्यावर वयाचे कोणतेही बंधन नाही, असे स्पष्ट झाले आहे.