मुंबई, 27 फेब्रुवारी : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी आज भुसावळ रेल्वे विभागाच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे गाड्यांचे थांबे, नवीन मार्ग, प्रवासी सुविधा, पायाभूत प्रकल्प आणि मालवाहतूक क्षेत्राच्या विकासावर चर्चा झाली.
यावेळी जनतेला सुलभ व सुखरूप प्रवासासाठी उत्तम रेल्वे संपर्क आणि पायाभूत सुविधा विकास सुनिश्चित करण्यावर भर देऊन, प्रवाशांच्या सोयीसंबंधी महत्त्वाचे मुद्दे आणि या भुसावळ रेल्वे विभाग व रावेर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीस रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रस्तावित योजनांवर लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.
या बैठकीत पुढील महत्वाच्या विषयावर चर्चा झाली –
गाड्यांचे थांबे आणि विस्तार – भुसावळ स्थानकावर अधिक गाड्यांचे थांबे मिळवण्याची मागणी. खंडवा-सनावद मेमू स्पेशल-भुसावळ मार्ग विस्ताराची गरज.
विशेष रेल्वे गाड्या आणि प्रवासी सुविधा –
भुसावळ-पुणे दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी,
विदर्भ एक्सप्रेससाठी व्हीआयपी कोटा राखीव ठेवण्यासंबंधी चर्चा.
अमरावती एक्सप्रेसमध्ये प्रथम श्रेणी कोच जोडण्याची मागणी.
पायाभूत सुविधा आणि सेतू प्रकल्प –
भुसावळ रेल्वे विभागातील पादचारी बोगदा (RUB) पुलांच्या समस्यांवर पुनरावलोकन,
भुसावळ रेल्वे विभागातील टर्निंग एरिया संदर्भात संयुक्त पाहणी.
नांदुरा ओव्हरब्रिजच्या कामासाठी ‘महा रेल्वे’ तर्फे त्वरित कार्यवाहीची सूचना.
वस्तू वाहतूक आणि निर्यात धोरण:
भुसावळ येथे कंटेनर लोडिंग सुविधेचे पुनरावलोकन,
एपीडा (APEDA) अंतर्गत निर्यात प्रक्रियेसाठी रेल्वे मंत्रालयाशी संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय.
इतर महत्त्वाचे मुद्दे –
भुसावळ येथे मेमू (MEMU) रेल्वे कार्यशाळेच्या देखभालीसाठी तातडीने उपाययोजना,
पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर करण्यावर चर्चा.
जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्गाचा विकास
पहुर-शेंदूर्णी स्थानकांवर मालवाहतूक सुविधा वाढवण्याचा प्रस्ताव.
कोविडपूर्व प्रवासी गाड्या पूर्ववत सुरू करण्यासाठी विचारविनिमय.