जळगाव, 28 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात दाखल झालेल्या ई-बसेस या पर्यावरण वाचविण्याचे नवे साधन आहेत. धूर व आवाज प्रदूषण कमी करून स्वच्छ हवा उपलब्ध करून देतील. इंधन बचतीमुळे प्रवासाचा खर्च कमी होईल आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वातानुकूलित, आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे या ई-बसेस म्हणजे हरित प्रवासाची नवी ओळख आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ७० ई-बसेसमधील पहिल्या टप्यातील १३ बसेसचे लोकार्पण आज जळगाव आगारातील विभागीय कार्यशाळा येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.
दृष्टीक्षेपात- ई-बसची वैशिष्ट्ये –
ई – बसेस पर्यावरणपूरक असून धूर व आवाज प्रदूषण शून्य आहेत. या बसेस बॅटरीवर चालणाऱ्या असल्याने इंधनाची मोठी बचत होणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असल्यामुळे प्रवाशांना थंडगार व आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार असून, पुशबॅक सीट व मोबाईल चार्जिंग यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या 13 बसेसमध्ये 12 मीटर लांबीच्या 8 व 9 मीटर लांबीच्या 5 वातानुकूलित बसेसचा समावेश आहे. 9 मीटर बस दर प्रति टप्पा ₹13.80 तर 12 मीटर बस दर प्रति टप्पा ₹15.15 असा ठेवण्यात आला असून, सर्वसामान्यांच्या आवाक्यातील दर आहेत. या बसेस जळगाव जिल्ह्यातील तालुका-ते-तालुका सेवेसह चाळीसगाव, जामनेर, शिरपूर, चोपडा तसेच छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नाशिक या मार्गांवर धावणार आहेत.
लोकार्पणानंतर प्रत्यक्ष प्रवास –
या सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ई बसची चार्जिंग प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय अधिकारी यांनी विभागीय कार्यशाळेपासून विमानतळापर्यंत बसने प्रवास करून प्रत्यक्ष चाचणी केली. या प्रवासानंतर मान्यवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते. विमानतळावर पहिल्यांदाच बस दाखल झाल्याने उपस्थितांनी कौतुक व आश्चर्य व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी केले. सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक संदीप सूर्यवंशी यांनी केले तर आभार संदीप पाटील यांनी मानले.
मान्यवरांची उपस्थिती –
या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, उपयंत्र अभियंता सुनील भालतिलक, वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदीप पाटील, सुरक्षा अधिकारी दिपक जाधव, कामगार अधिकारी कमलेश भावसार, लेखाधिकारी मिलिंद सांगळे, कमलेश भावसार, विभागीय अभियंता निलेश पाटील यांच्यासह अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.