मुंबई, 20 फेब्रुवारी : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलचा 17 वा हंगाम हा 22 मार्चपासून सुरू होऊ शकतो. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आयपीएलचा 17 वा हंगाम –
आयपीएल 2024 च्या वेळापत्रकाबाबत आयपीएलचे चेअरमन अरुण धुमल यांनी सांगितले की, आयपीएलचा 17 वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार असून संपूर्ण सीझन भारतातच खेळवले जाणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी रंगणार आहे. यापूर्वी, भारतात लोकसभा निवडणूकीमुळे आयपीएल भारताबाहेर खेळवली जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, पण आता या चर्चा थांबल्या आहेत. आयपीएल पूर्णपणे भारतात आयोजित केले जाईल.
टी-20 वर्ल्ड कप जूनमध्ये –
अरूण धुमाळ पुढे म्हणाले की, सध्या केवळ सुरुवातीच्या 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल आणि उर्वरित सामन्यांच्या तारखा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठरवल्या जातील. तसेच आयपीएल 2024 पार पडल्यानंतर 1 जूनपासून टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे.