नवी मुंबई, 3 नोव्हेंबर : भारतीय महिला क्रिकेट संघाने यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करत अखेर तो ऐतिहासिक क्षण आपल्या नावावर केला. नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या महिला खेळाडूंनी प्रथम फलंदाजी करत 298 धावा उभारल्या. यामध्ये शफाली वर्मा हिने 87 धावांची खेळी करत संघाचा पाया भक्कम केला. तिच्या सोबत स्मृती मानधना (45 धावा) आणि दीप्ती शर्मा (58 धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
भारतीय संघाच्या महिला खेळाडूंनी उभारलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रत्युत्तरात 246 धावांवर बाद झाला. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची कर्णधार लॉरा वॉल्वार्ड्टने 101 धाव करत शतक झळकावले. मात्र, दुसऱ्याबाजून तिला फलंदाजीत अपक्षेत अशी साथ न मिळाल्याने लॉराची खेळी अयशस्वी ठरली. दरम्यान, गोलंदाजीत दीप्ती शर्मा हिने पाच विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघाचा विजयाचा पाया रचला.
तिसऱ्यांदा अंतिम फेरीत अन् तब्बल 47 वर्षानंतर प्रथमच जिंकला विश्वचषक –
भारतीय महिला क्रिकेट संघ 2005 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक फायनलमध्ये पोहोचला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात भारताला हरवून चॅम्पियन बनले होते. 2017 मध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला अन् जिथे इंग्लंडने विजेतेपद जिंकले. दरम्यान, यंदा भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचून दक्षिण आफ्रिकेविरोधात लढला. दरम्यान, संपुर्ण विश्वषकात दमदार कामगिरी करत भारतीय महिला क्रिकेट संघाने तब्बल 47 वर्षानंतर प्रथमच विश्वचषक जिंकला.
बीसीसीआयकडून 51 कोटी रूपयांचे बक्षीस –
भारतीय महिला क्रिकेट संघाने यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करत विश्वविजेता होऊन इतिहास रचलाय. या विजयाने संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आहे. प्रधानमंत्रींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी महिला संघाचे कौतुक केले आहे. दरम्यान, बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाला ₹51 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.






