नाशिक, 31 ऑक्टोबर : प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात एका तरी कलेची साधना करावी, त्यामुळे व्यक्तीमत्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आणि मा. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात इंद्रधनुष्य संघ निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाली, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. माधुरी कानिटकर या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर स्पर्धेचे परिक्षक प्रा. रविंद्र कदम, श्री. रवी जन्नावार, श्री. भूषण कापडणे, श्रीमती पल्लवी जन्नावार, श्रीमती भाग्यश्री गुजर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. बाळासाहेब पेंढारकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असतांना ताणतणावांचा सामना करावा लागतो. ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येकाने एका कलेचे तरी प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे. विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना संपूर्ण व्यक्तीमत्त्व विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे समन्वयक, डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सांगितले की, पाच मुख्य कलाप्रकारात राज्यातील विविध ठिकाणी ’स्पंदन’ महोत्सव संपन्न झाला असून विजेते विद्यार्थ्यांमधून विद्यापीठाचा संघ निवडला जाणार आहे. तर विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी सांगितले की, आंतरविद्यापीठातील इंद्रधनुष्य स्पर्धा औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे संपन्न होणार असून आरोग्य विद्यापीठाचा विद्यार्थ्यांचा संघ यात सहभागी होणार आहे.
विद्यार्थी कल्याण विभागाचे श्री. बी. आर. पेंढारकर यांनी नियमांची व आयोजनाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. ‘इंद्रधनुष्य’ विद्यापीठस्तरीय संघ निवड चाचणी स्पर्धेकरीता विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व स्पर्धक मोठया संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेचे परिक्षक प्रा. रविंद्र कदम, श्री. रवी जन्नावार, श्री. भूषण कापडणे, श्रीमती पल्लवी जन्नावार, श्रीमती भाग्यश्री गुजर व डॉ. स्वप्नील तोरणे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना अभिनय, नृत्य, संगीत, प्रकाश योजना, व्यासपीठावरील वावर आदींबाबत मार्गदर्शन केले.