जळगाव, 8 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्याचा पती तसेच एकास पकडले आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
सरपंच भानुदास पुंडलिक मते ( वय – 44, सरपंच, रिंगणगाव ता. एरंडोल), समाधान काशिनाथ महाजन (वय – 38, ग्रामपंचायत सदस्यांचा पती, रा. रिंगणगाव) आणि संतोष नथ्थु पाटील (वय 49 रा. कल्याण होळ ता. धरणगाव) असून असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून याप्रकरणी रामनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करित आहेत.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी जलजीवन मिशनअंतर्गत 1 कोटी 50 लाख रुपयांच्या कामांपैकी 1 कोटी 27 लाख रुपये प्राप्त केले होते. उर्वरित सुमारे 23 लाख रुपयांची देय रक्कम मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत प्रलंबित होती. मात्र, कामाचे हस्तांतर करारनामा पूर्ण न झाल्याने देयक थांबले होते.
ठेकेदाराने सरपंच मते आणि ग्रामपंचायत सदस्यांचा पती समाधान महाजन यांना हस्तांतर करारनामा करण्याची विनंती केली असता, त्यांनी त्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने 6 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली.
…अन् एसीबीने पकडले रंगेहात –
पडताळणी दरम्यान आरोपींनी 80 हजार रुपयांवर सौदा ठरवून ती रक्कम 8 ऑक्टोबर रोजी घेण्याचे मान्य केले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने जळगावातील काव्यरत्नावली चौकात सापळा रचला असता, सरपंच मते व समाधान महाजन यांनी खाजगी इसम संतोष पाटीलमार्फत 80 हजार रुपये स्वीकारले. त्याचवेळी पथकाने तिघांना रंगेहात पकडले. याप्रकरणी रामनंदनगर पोलीस स्टेनशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
यांनी केली कारवाई –
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोना. बाळू मराठे, पोकॉ. अमोल सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली.