जळगाव, 16 जानेवारी : जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच शहरातील पिंप्राळा परिसरात गोळीबाराचा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सहा ते सात महिन्यांपूर्वी केलेल्या बांधकामाचे थकीत पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाने पिंप्राळा हुडको परिसरातील गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मुस्तफा शेख सलीम (३६) यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, वेळीच समोरील व्यक्तीला धक्का दिल्याने मुस्तफा शेख थोडक्यात बचावले. त्यांच्या भावावरही गोळी झाडण्यात आली, परंतु तीही लक्ष्य चुकली. ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी पिंप्राळ्यातील आनंदबन सोसायटी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नेमकं प्रकरण काय? –
मुस्तफा शेख यांनी बांधकाम करून दिलेल्या व्यक्तीकडे पैसे मागितले होते. त्यानंतर, बुधवारी दुपारी ते नातेवाईक शाहीद शेख सुभान (१८, रा. ख्वाजानगर) याच्यासह दुचाकीने मतदानासाठी पिंप्राळा परिसरात जात असताना आनंदबन सोसायटीजवळ समोरून दुचाकीवर आलेल्या दोघांनी पैशांच्या वादातून त्यांच्यावर मारहाण केली. याचवेळी अन्य दोन दुचाकींवरून चार जण घटनास्थळी आले.
त्यापैकी एका व्यक्तीने थेट मुस्तफा शेख यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखली. मात्र, प्रसंगावधान राखत मुस्तफा शेख व त्यांच्या नातेवाइकाने त्या व्यक्तीला धक्का दिल्याने गोळी लक्ष्य चुकली. मात्र, हल्लेखोराने शाहीद याच्या खांद्यावर पिस्तूलच्या उलट बाजूने मारून दुखापत केली तसेच त्याचा मोबाईल हिसकावून नेला.
पोलिसांनी घटनास्थळाची केली पाहणी –
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा : जळगावात कुणाची सत्ता? आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरूवात, जिल्हावासियांचे निकालाकडे लक्ष






