जळगाव, 15 जानेवारी : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना खळबळजनक बातमी समोर आली आहे. जळगाव तालुक्यातील बोलाणे गावात एक धक्कादायक घटना घडली असून जुन्या वादातून भररस्त्यात एकाची चॉपरने निर्घृण हत्या करण्यात आली. बाळकृष्ण सदाशिव कोळी (वय ४५, रा. भोलाणे, ता. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत मृत व्यक्तीचा अल्पवयीन मुलगाही जखमी झाला असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जुन्या वादातून चॉपरने वार –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी बुधवारी (१४ जानेवारी) दुपारी भोलाणे बसस्थानक परिसरात बाळकृष्ण कोळी आणि संशयित आरोपी आकाश रामकृष्ण कोळी यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळून आला. रागाच्या भरात आकाश कोळी याने बाळकृष्ण कोळी यांच्यावर चॉपरने सलग तीन वार केले. गंभीर जखमी झाल्याने बाळकृष्ण यांचा जागीच मृत्यू झाला.
मुलगा जखमी –
हल्ल्याच्या वेळी बाळकृष्ण यांचा लहान मुलगा वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये धावला असता, आरोपीच्या चॉपरचा वार त्याच्या हाताला लागून तो जखमी झाला. या घटनेच्या वेळी आरोपी आकाश कोळी याचे वडील रामकृष्ण कोळी व काका प्रकाश कोळी हेही घटनास्थळी उपस्थित असल्याचे समजते.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना –
मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या बाळकृष्ण कोळी यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, भाऊ तसेच दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी मृताच्या भाऊ नरेंद्र कोळी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : Video | ‘मुंबईवर कुणाचा ताबा असेल, प्रेसिडेंट ट्रम्पही आजच्या मतदानाकडे लक्ष ठेऊन असतील’,संजय राऊतांची प्रेस






