मुंबई, 7 मे : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावत जळगाव जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालक सचिव तथा महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, प्रधान सचिव, सचिव, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या मोहिमेद्वारे जिल्ह्यात प्रशासनाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडून नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम झाली आहे. ‘जळगाव संवाद’ या नव्या तक्रार निवारण यंत्रणेमुळे नागरिकांचा थेट सहभाग वाढला आहे. ‘JIVANT’ मोहिमेमुळे विविध शासकीय यादींमधून मृत नावे हटविण्यात आली आहेत. ‘ई-ऑफिस’ प्रणालीच्या माध्यमातून 16,000 हून अधिक फाईल्स जलदगतीने निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच, डिजिटल गव्हर्नन्सचा अंगीकार करून शेतसुलभ योजना, ई-क्वासी-ज्यूडिशियल प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यामुळे कार्यक्षमता व पारदर्शकता वाढली आहे.
UDAN योजनेअंतर्गत सुरू झालेल्या हवाई सेवेमुळे जिल्ह्याचा दळणवळण संपर्क अधिक सुलभ झाला असून, 1 लाखांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून 10 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्यात आली आहे.
100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत, जळगाव जिल्हा पोलीस दलाने विविध उपक्रमांद्वारे नागरिकसेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. युजर फ्रेंडली वेबसाइटची निर्मिती, जलद पारपत्र व चारित्र्य पडताळणी सेवा, तक्रार निवारण दिवसांचे आयोजन, QR कोडद्वारे ऑनलाइन तक्रार प्रणाली, सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अभ्यागत मदत कक्षांची उभारणी, वर्षानुवर्षे पडून असलेल्या वाहनांची निर्गती, मुदतबाह्य अभिलेखांचे निर्लेखन तसेच पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी ‘Top Cop of the Month’ ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.