जळगाव, 7 ऑक्टोबर : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आयुष प्रसाद यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील 7 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या –
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये नाशिक, जळगाव, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत.
जळगावहून आयुष प्रसाद यांची बदली –
भारतीय प्रशासकीय सेवेच्या महाराष्ट्र कॅडरचे 2015 च्या बॅचचे अधिकारी असलेले आयुष प्रसाद यांनी जुलै 2023 मध्ये जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. अशातच आज त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.
रोहन घुगे असणार जळगावचे जिल्हाधिकारी –
आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या सल्ल्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून आयुष प्रसाद यांच्याकडून जळगावच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे रोहन घुगे यांच्या बदलीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोण आहेत रोहन घुगे –
रोहन घुगे हे एक भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 2018 च्या बॅचचे अधिकारी आहेत. वर्धा तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी राहिलेली आहे. यासोबतच त्यांनी कुपोषणमुक्त गावे यांसारख्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. दरम्यान, घुगे यांची आता जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.