जळगाव, 1 मार्च : जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रब्बी हंगामाचा काढणीला आलेल्या मालाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
अवकाळी पावसाचा फटका –
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव चोपडा, पारोळा तालुक्यासह इतर भागात अवकाळी पाऊस झाला आहे. आज दुपारी पावसाचे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर वरील तालुक्यांपैकी काही भागात अजूनही पाऊस सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जळगाव शहर, बोदवड, मुक्ताईनगर, एरंडोल, भुसावळसह इतर भागात सध्यास्थित पाऊस पडला नसून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान –
शेतकऱ्यांच्या सध्या रब्बी हंगामीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. आज जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे धरणगाव, पारोळा आणि चाळीसगावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
‘असा’ आहे पावसाचा अंदाज –
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 48 तासांत पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तराखंड, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.
काढणीस आलेली पिके झाकून ठेवा –
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने जोरदार फटका दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा दिल्याने रब्बी पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची काढणीस आलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
हेही वाचा : आई-वडील मजूर, मुलाचा लंडनमध्ये सन्मान, कोण आहे विदर्भातील हा तरूण?