जळगाव, 2 नोव्हेंबर : शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातील सर्व शेतकरी खातेदारांचे एकत्रित डिजिटल डेटाबेस तयार करण्यासाठी “ॲग्रीस्टॅक( Agristack)” हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व शेतकरी खातेदार बांधवांना नैसर्गिक आपत्ती अनुदान तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकरी खातेदाराचा डिजिटल शेतकरी आयडी (Digital Farmer ID) तयार केला जाणार आहे. या आयडीद्वारे शेतकऱ्यांना सर्व कृषी विषयक शासकीय योजना, दुष्काळी अनुदाने, पिक विमा योजना तसेच इतर कृषी योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळणार आहे.
या नोंदणीसाठी सेतु सुविधा केंद्रे व महा ई-सेवा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.नोंदणीसाठी, आधार कार्डाची प्रत, 7/12 उतारा,बँक पासबुकची प्रत,मोबाईल क्रमांक,ही कागदपत्र आवश्यक आहेत.नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा डिजिटल शेतकरी आयडी क्रमांक प्रदान करण्यात येईल.
यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच सेतु सुविधा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावा.फक्त ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच शासनाच्या विविध योजनेचा लाभ सुलभतेने मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी वरीलप्रमाणे कागदपत्रांसह संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा सेवा केंद्रांशी संपर्क साधून आपली नोंदणी तातडीने पूर्ण करावी आणि या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे जिल्हा प्रशासनाने, प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.






