जळगाव, 28 ऑगस्ट : जळगाव शहरातून एक मोठी बातमी समोर आलीय. शहरातील एका हॉटेल व लॉजिंगवर सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या कारवाईत 5 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी हॉटेलचे मालक-चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसीतील सेक्टर जी सेक्टरमध्ये असलेले सागर हॉटेल व लॉज येथे बेकायदेशीर पध्दतीने कुंटणखाना सुरू असतानाची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता छापा टाकला.
पाच पीडित महिलांची सुटका –
दरम्यान, या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला यांनी याबाबतची फिर्याद दिली असता, हॉटेल मालक सागर नारायण सोनवणे (रा. जळगाव) आणि चालक सागर सुधाकर पाटील या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत यांचा समावेश –
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक विकास सातदिवे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा तेली, पोहेकॉ मुकुंदा पाटील, रामदास कुंभार, विनोद भास्कर, भरत डोके यांच्यासह इतरांनी ही केली आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.
हेही वाचा : ‘आमदार, खासदार असताना काय केले?, उन्मेश पाटलांचे आंदोलन म्हणजे थोतांड’, मंत्री अनिल पाटील यांची जोरदार टीका