एरंडोल, 17 जून : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे एका 13 वर्षीय मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर आज एरंडोलमध्ये मुलाच्या हत्येप्रकरणी आम्हाला न्याय हवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत महिलांनी रस्ता रोको आंदोलन केले. तसेच नरबळीसाठी अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय. दरम्यान, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणावर महत्वाची माहिती दिली आहे.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात रिंगणगाव येथे गजानन महाजन यांचे हार्डवेअर साहित्य विक्रीचे दुकान आहे. दरम्यान, काल सोमवार 16 जून रोजी गजानन महाजन हे जळगावला कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा राजेश यास दुकानात थांबण्यास सांगितले होते. राजेश दुपारपर्यंत दुकानावर थांबला. मात्र, दुकान बंद केल्यानंतर तो घरी पोहोचलाच नाही. यानंतर राजेशचा कुटुंबियांकडून सर्वत्र शोध घेण्यात आला. यानंतर एरंडोल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली.
….अन् राजेशचा मृतदेह आढळला –
एरंडोल पोलिसांना तपासाला वेग देत राजेशचा शोध घेण्यास सुरूवात केली. यानंतर आज सकाळी एरंडोल तालुक्यातील खर्ची गावालगतच्या शिवारात राजेशचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतहेह आढळून आला. दरम्यान, महाजन कुटुंबियांना बरोबर घेत पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी गाठले असता मृतदेह राजेश याचाच असल्याची खात्री पटली.
अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी घटनास्थळी न्यायवैद्यक पथकला पाचारण करण्यात आले. याठिकाणी श्वान पथकाद्वारे देखील शोध घेण्यात आला. यानंतर पोलिसांनी पंचनामा पूर्ण करत मृतदेह पुढील तपासणीसाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. आज जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासासाठी महत्वपुर्ण सूचना केल्या.
View this post on Instagram
जळगावचे एसपी काय म्हणाले? –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, रिंगणगावातून 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा हरविल्याची तक्रार एरंडोल पोलिसात प्राप्त झाली होती. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज सकाळी 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या गळ्यावरती जखम असल्याचे आढळून आले. दरम्यान, मुलाचा मृतहेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून नेमका खून कोणी केला याबाबत पुढील तपास सुरू आहे.
ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन –
रिंगणगावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महिलांसह ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांनी संतप्त होत “आमच्या बाळाला न्याय हवा; गुन्हेगाराला फाशी द्या” , अशी मागणी केली. यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश पाहायला मिळाला.