मुंबई, 31 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गरुड आणि जामनेर तालुका अध्यक्ष विलास राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत काल भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करत मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात नवीन जामनेर पॅटर्न तयार केल्याचे उद्गार काढले.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? –
मुंबईतील यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय गरूड यांच्या प्रवेशानिमित्ताने गिरीश भाऊंनी तर एक नवीन जामनेर पॅटर्न तयार केला. ज्यामध्ये वर्षानुवर्ष एकमेकांच्याविरोधात लढणारे- राहणारे असे दोन नेते एकत्रित येऊन कार्यकर्ते देश, समाज, राज्य व पक्षाच्या हिताकरिता एकत्रित येऊन राहू शकता. हा एक अतिशय उत्तम अशाप्रकारचा पॅटर्न त्यांनी आणला आहे.
म्हणून मी हा निर्णय घेतला –
गिरीश महाजन यांना आता तुमचा सिनेमा ‘हम साथ साथ है’, आणि हा आता असाच चालुद्या, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच संकटकाळी धावून जाणारा माणूस आपला नेता आणि म्हणून मी हा निर्णय घेतला असून सुरक्षित घरट्यात आपले कार्यकर्ते राहावे, या उद्देशाने मी हा निर्णय घेतला आहे, असे संजय गरुड यांनी पक्षप्रवेशावेळी स्पष्ट केले.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आम्ही एकत्र झालो. आज बघा आपल्यात सर्व मिसळून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीचे आपल्यात आले. आता आपल्याला मिसळून काम करायचे आहे. आता मनात कोणी काही ठेवू नका. आपण आता एका छताखाली आहोत. आपला तालुका नंबर एकने निवडून आला पाहिजे. आपण एक मोठा मेळावा जामनेरला घेऊ. देवेंद्र फडणवीस पण त्या मेळाव्याला येतील. हा एक चित्रपट आहे, संजय गरुड आले म्हणजे. पण अजून चित्रपट बाकी आहेत. हा एकच पक्ष बाकी सर्व पक्ष बंद करुन टाकू, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
हेही वाचा : मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेश