नवी दिल्ली, 14 मे : न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज सकाळी 10 वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची जबाबदारी हाती घेतली असून देशाचे 52 वे सरन्यायाधीश ठरले आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजता न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली.
राष्ट्रपतींनी दिली शपथ –
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शपथविधीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांना पद व गोपिनियतेची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री यांच्यासह उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.
न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश –
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर ते 52 वे सरन्यायाधीश ठरले आहेत. यासोबतच अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करणारे दुसरे न्यायाधीश ठरले आहेत. यापुर्वी, या वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याचा पहिला बहुमान न्या. के.जी बालकृष्णन यांना मिळाला होता. दरम्यान, न्यायमूर्ती भूषण गवई सरन्यायाधीश पदी विराजमान झाल्यानंतर त्यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असून नोव्हेंबर 2025 मध्ये ते सेवानिवृत्त होतील.
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा प्रवास –
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अमरावती येथे 24 नोव्हेंबर 1960 रोजी जन्म झाला असून त्यांनी 1985 साली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. यासोबतच नागपूर विद्यापीठातून पदवी आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. दरम्यान, 1987 ते 1990 च्या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्वतंत्रपणे वकिली व्यवसाय केला.
नागपूर, अमरावती महापालिकेसह अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील म्हणून त्यांनी या काळात काम केले असून. सिकॉम, डीसीव्हीएल आदी संस्था आणि विदर्भातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची बाजू त्यांनी मांडली. तसेच 1992 ते 1993 या काळात ते नागपूर खंडपीठात अतिरिक्त सरकारी वकील होते. तर 2000 साली याच खंडपीठात ते सरकारी वकील बनले. नोव्हेंबर 2003 मध्ये त्यांची अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली होती.
2019 साली सर्वोच्च न्यायालयात मिळाली पदोन्नती –
न्यायाधीश म्हणून भूषण गवई यांच्या कारकिर्दीची सुरुवात नोव्हेंबर 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश या पदापासून झाली होती. मुंबई उच्च न्यायालयात 2005 मध्ये ते कायम न्यायाधीश बनले. न्यायमूर्ती गवई यांना मे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळाली होती.
वडिलांचं मोठ नाव-
न्यायमूर्ती भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई (रा. सु. गवई) हे राजकारणातील बडे प्रस्थ होते. अमरावती मतदारसंघाचे खासदार म्हणून रा. सु. गवई यांनी प्रतिनिधित्व केले होते. यासोबतच बिहारसह अन्य काही राज्यांचे राज्यपालपद त्यांनी भूषवले होते.