चाळीसगाव, 16 फेब्रुवारी : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना कन्नड घाटात कार अपघाताची घटना समोर आलीय. कन्नड घाटातून चाळीसगावकडे येत असताना कार दरीत कोसळ्याल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहे. यामध्ये मुकेश महाजन (36,रा. नाशिक) असे मृत युवकाचे नाव असून विजय महाजन, जितेंद्र महाजन आणि दीपक बोराडे (रा.न्हावी, ता.यावल, जळगाव) असे जखमींचे नाव आहे. कन्नड घाटातील मल्हार गडाजवळ काल 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश महाजन यांच्यासह सोबत असलेले तीन जण हे काल शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरकडून चाळीसगावकडे कन्नड घाटातून कारने जात होते. कन्नड घाटातील जय मल्हार पॉइंटजवळ चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने त्यांची कार शेजारच्या खोल दरीत जाऊन कोसळली. दरम्यान, या अपघातात कारमधील मुकेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच एक जण गंभीर जखमी झाला तर दोघांना किरकोळ दुखापत झाली.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सदर अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदकार्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला तर अपघातातील इतर जखमींना उपचारासाठी चाळीसगावमध्ये दाखल केले.
हेही पाहा : गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधास गेले पोलीस अन् झाला हल्ला; उमर्टी गावातील नेमकी घटना काय?