जळगाव, 28 जून : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्था यांच्या समवेत 9 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. तसेच बी. कॉम. रिटेल मॅनेजमेंट, बीएससी अप्लाइड बायोलॉजी, बीए ह्युमेनिटीज अँड सिव्हिल सर्व्हिसेस या तीन अप्रेंटिसशिप एम्बेडेड डीग्री प्रोग्रामसह एम ए ट्रायबल अकॅडमी आणि पी जी डिप्लोमा इन एनजीओ मॅनेजमेंट प्रोग्रामच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करुन या अभ्यासक्रमाच्या प्रारंभाची घोषणा करण्यात आली.
प्रारंभी प्रातिनिधीक स्वरुपात करारावर विद्यापीठाकडून कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी व प्रोग्रेसिव ग्रोसर्स (नवजीवन प्लस सुपर शॉप) चे संचालक अनील कांकरीया यांनी स्वाक्षरी केल्या. त्यानंतर करार हस्तांतरण करण्यात आले.
करार हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जळगावच्या वतीने उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जळगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक ली. च्यावतीने अध्यक्ष अनिकेत पाटील, जळगाव जनता बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कडून श्री. भट व डॉ. के. बी. पाटील, नॅचरुली युवर्स बायोटेक तर्फे संचालक निलेश तेली, दीपक मेडिकल अमळनेरचे दीपक पाटील, बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, मुंबई कडून प्रदीप थेंगडे व बीआयएएफच्या पूनम पाटील आदी. उपस्थित होते.