पुणे, 27 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या रेव्ह पार्टी प्रकरणात यांच्यासह दोन महिलांसह पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून दारू, ड्रग्स, गुटखा आणि अंमली पदार्थ पोलिसांना जप्त केले.
नेमकं बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील एका उच्चभ्रू रहिवासी सोसायटीमध्ये ऑनलाईन पद्धतीने हाऊस पार्टीसाठी तीन फ्लॅट बूक करण्यात आले होते. यापैकी एका फ्लॅटमध्ये पार्टी सुरु होती आणि या पार्टीत ड्रग्जचे सेवन केले जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली. दरम्यान, या माहितीच्या आधारे पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत या फ्लॅटमध्ये दोन महिला आणि पाच पुरुष आढळून आले असून पोलिसांनी या सगळ्यांना अटक केली.
नाथाभाऊंच्या जावयाला अटक –
पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर सापडल्यामुळे त्यांना देखील पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रांजल यांनी ड्रग्ज सेवन केले होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे सातत्याने सरकारविरोधात आरोप करत होते. अशातच त्यांच्या जावईला अटक करण्यात आल्याने राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता वर्तविली जातेय.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया –
प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत याबाबत एकनाथ खडसे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, यासंदर्भातील मला माहिती माध्यमांकडूनच पहिल्यांदा भेटत आहे आणि हे होणारच होतं हे मला माहीत आहे. तसेच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असून राजकीय सुडबुद्धीतून कारवाईची शक्यता नाकारता येत नसल्याचेही खडसे यांनी स्पष्ठ केले आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस अजिबात तपास करणार नाहीत कारण त्यांच्यावर दबाव असू शकतो. मात्र, जो दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया –
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी आज सकाळीच संवाद साधला. मंत्री महाजन म्हणाले की, याप्रकरणात पोलिस तपास करत आहे. त्यामुळे याविषयीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण जी माहिती हाती आली आहे. त्यानुसार, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे या पार्टीत होते. त्यांचा समावेशच नव्हता तर त्यांनी ही पार्टी आयोजित केली होती, असा आरोप महाजन यांनी केला. स्थानिक पोलिसांकडून तपास सुरु असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.