मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 16 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, चोपडा विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रा. चंद्रकांत सोनवणे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रभाकर सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचा 1962 सालापासून इतिहास कसा राहिलाय, हे जाणून घेऊयात.
चोपडा विधानसभा मतदारसंघ –
चोपडा विधानसभा मतदारसंघ (10) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चोपडा मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील किनगांव, साकळी ह्या महसूल मंडळे यांचा समावेश होतो. चोपडा ह्या विधानसभा मतदारसंघाचा रावेर लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. तसेच हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे. दरम्यान, सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लताताई सोनवणे ह्या करित आहेत.
गेल्या 10 वर्षांपासून सोनवणे कुटुंबियांकडे मतदारसंघाची धूरा –
चोपडा विधानसभा मतदारसंघाची गेल्या 15 वर्षांपासून सोनवणे कुटुंबियांकडे मतदारसंघाची धूरा आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकात सोनवणे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकिट मिळाले होते. दरम्यान, या निवडणुकीत लताताई सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांचा पराभव केला होता. तर आता या निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
प्रा. चंद्रकांत सोनवणे विरुद्ध प्रभाकर सोनवणे अशी लढत –
2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे हे चोपड्याचे आमदार म्हणून प्रथमतः निवडून आले होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे एकेकाळी भाजपमध्ये असलेले प्रभाकर सोनवणे ह्यांनी 2019 साली अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना लताताई सोनवणे यांना अपक्ष उमेदवार म्हणून मोठे आव्हान दिले होते. आणि आता त्यांना शिवसेनना ठाकरे गटाकडून ते निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चोपड्यात प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे अशी जोरदार लढत रंगणार आहे.
मतदारसंघाचा 1962 पासूनचा इतिहास –
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं? –
चोपडा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लताताई सोनवणे, जगदीशचंद्र वळवी तसेच प्रभाकर गोटू सोनवणे यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. यामध्ये लताताई यांना 78 हजार 137, जगदीश वळवी यांना 57 हजार 608 तर प्रभाकर सोनवणे यांना 32 हजार 459 इतकी मते मिळाली होती. दरम्यान, लताबाई सोनवणे यांचा 20 हजार 529 इतक्या मतांनी विजय झाला होता. यासोबतच डॉ. बिर्ला चंद्रकांत जामसिंग, अॅड. याकुब सायबु तडवी, माधुरी किशोर पाटील, ईश्वरलाल सुरेश कोळी, दगडू फत्तु तडवी हे देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
मतदारसंघातील राजकीय गणिते –
चोपडा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कोळी समाज आहे. यासोबतच गुर्जर तसेच मराठा ह्या समाजातील मतदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना कोळी समाजातील जात प्रमाणपत्रांचा मुद्दा गाजला होता. अलीकडच्या काळात विद्यमान आमदारांकडून विकास कामे केले जात असल्याचा दावा केला जात आहे. तर विरोधी पक्षातील उमेदवार मतदारसंघात विकास करणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. दरम्यान, या मतदारसंघातील मतदार नेमका कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.