चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 9 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरु आहे. तसेच राजकीय नेते प्रचारात व्यस्त झाले आहेत. असे असताना जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश भोळे (राजू मामा) विरूद्ध ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला उमेदवार जयश्री महाजन अशी लढत रंगणार आहे. यासह डॉ. आश्विन सोनवणे तसेच मयुर कापसे यांचे अपक्ष म्हणून या निवडणुकीत आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?, याची देखील सर्व सामान्य मतदारांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा 1962 पासूनचा आतापर्यंतचा इतिहास कसा राहिलाय, हे जाणून घेऊयात.
जळगाव शहर विधानसभा –
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ (13) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव शहर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील फक्त जळगाव महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. जळगाव शहर ह्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे हे गेल्या दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत.
राजू मामांची हॅट्रिक होणार? –
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश दामू भोळे हे राजू मामा ह्या नावाने याठिकाणी परिचित आहेत. 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 अशा दोन टर्मपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजपकडून सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली असून सध्या त्यांचा प्रचार सुरू आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच लोकसभा निवडणुकीत जळगाव शहरातून विद्यमान खासदार स्मिता वाघ यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. असे असताना सुरेश भोळे यांची हॅट्रिक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवेसना (उबाठा) कडून जयश्री महाजन यांना उमेदवारी –
जळगाव शहर हा मतदारसंघ 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेकडे होता. मात्र, 2024 निवडणुकीत हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेला आल्यानंतर, जळगाव महानगरपालिकेच्या माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी देण्यात आली. खरंतर, ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी निवडणूक लढविण्यासाठी काही दिवसांपासून तयारी सुरु केली होती. यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते आतापर्यंत त्या प्रचार दौऱ्यात व्यस्त आहेत.
प्रमुख पक्षाकडून 1962 नंतर महिला उमेदवाराला संधी –
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचा 1962 पासून ते आतापर्यंतच्या इतिहास सर्वप्रथम महिला उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने प्रतिभाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सदाशिवराव नारायण भालेराव यांचा त्यांनी पराभव केला होता. दरम्यान, काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांना महिला उमेदवार म्हणून संधी दिल्यानंतर, एखाद्या प्रमुख पक्षाकडून 1962 नंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जयश्री महाजन यांच्या माध्यमातून महिला उमेदवाराला निवडणुक लढण्याची संधी मिळाली आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती –
विधानसभा निवडणूक 2024 साठी जळगाव शहर मतदार संघात जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक 29 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे सुरेश भोळे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री महाजन, मनसेचे डॉ. अनुज पाटील, ललित घोगले (वंचित), भाजपचे अपक्ष बंडखोर उमेदवार डॉ. आश्विन सोनवणे आणि ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील यांच्यात ही लढत रंगणार आहे.
जळगाव शहर विधानसभेत बंडखोरी –
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीत या निवडणुकीत बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. विद्यमान आमदार सुरेश भोळे यांची उमेदवारी कायम राहिल्यामुळे भाजपच्या तिकिटीवर निवडणुकी लढवण्यासाठी डॉ. आश्विन सोनवणे तसेच मयुर कापसे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून आव्हान उभं केलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून जयश्री महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, मशालकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बंडखोरी केली असून त्यांचे देखील अपक्ष उमेदवार म्हणून आव्हान असणार आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं? –
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपकडून सुरेश भोळे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली होती. तर दुसरकीडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिषेक शांताराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुरेश भोळे विरुद्ध अभिषेक पाटील अशी प्रमुख लढत याठिकाणी रंगली होती. यामध्ये सुरेश भोळे यांना एकूण 1 लाख 13 हजार 310 इतकी मते मिळाली होती. तर अभिषेक पाटील यांनी 48 हजार 646 इतकी मते मिळाली होती. यासोबतच वंचितचे शफी ए नबी शेख. यांनी 6 हजार 330 तर मनसेकडून अॅड. जमील देशपांडे यांनी 3 हजार 481 मते मिळवली होती. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश भोळे हे 64 हजार 664 मतांनी आमदार म्हणून विजयी झाले होते.
सुरेश जैन यांचा केला होता पराभव –
जळगाव शहर मतदारसंघावर शिवसेनेचे जेष्ठ नेते सुरेश जैन ह्यांचे वर्चस्व राहिलेले आहे. सुरेश जैन हे तब्बल 9 वेळा आमदार म्हणून या मतदारसंघात निवडून आले होते. सर्वप्रथम त्यांनी 1980 साली काँग्रेसकडून आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयी झाले होते. त्यानंतर काँग्रेस तसेच शिवसेना पक्षावर निवडणूक लढवत सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम सुरेश जैन यांच्या नावावर अबाधित आहे. दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सुरेश भोळे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी सुरेश जैन यांचा पराभव करत विजयीरथ रोखला.
मतदारसंघाच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष –
जळगाव शहरचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना या विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी विजय मिळवला तर 1962 नंतर महिला आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्या करू शकतात. यासोबतच डॉ. आश्विन सोनवणे, मयुर कापसे, कुलभूषण पाटील, डॉ. अनुज पाटील, ललित घोगले हे उमेदवार देखील विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. यामुळे राजू मामांची हॅट्रिक होणार की जयश्री महाजन यांना मतदार संधी देणार किंवा मतदारसंघाला नवीन चेहरा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : हिना गावीत यांच्यासह ए टी पाटील, अमोल शिंदे यांचे भाजपकडून राजीनामे मंजूर, अपक्ष म्हणून आव्हान कायम