चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 8 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत ऐन रंगात आली असताना पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलंय. खरंतर, पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या लढतीवरुन संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारांकडे लागले आहे. तर या मतदारसंघाचा 1962 पासूनचा आतापर्यंतचा इतिहास कसा राहिलाय?, याबाबत ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’चा हा स्पेशल रिपोर्ट.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ –
पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील काही गावे मिळून पाचोरा विधानसभा मतदारसंघ (18) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पाचोरा मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुका (कुऱ्हाड महसूल मंडळ वगळून) आणि भडगाव तालुक्यातील कोळगाव, भडगांव आणि गोंडगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे किशोर आप्पा पाटील हे विद्यमान आमदार आहेत.
किशोर आप्पांची हॅट्रिक होणार? –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहे. 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 अशा दोन टर्मपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पाचोरा-भडगाव विधासभा मतदारसंघात महायुतीत जागावाटपाचा पेच असताना शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्या वाटेला हा मतदारसंघ आला आणि किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील सध्या प्रचार दौऱ्यात व्यस्त आहेत. असे असताना किशोर आप्पांची हॅट्रिक होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली सुर्यवंशी –
पाचोरा-भडगाव मतदारसंघ हा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेला येणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. असे असताना स्व. आर ओ तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सुर्यवंशी यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून याठिकाणी उमेदवारी देण्यात आली. राज्यात 2022 साली शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर वैशाली सुर्यवंशी ह्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीसाठी रणनिती आखायला सुरूवात केली होती. दरम्यान, विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या त्या सख्या चुलत बहिण असून त्यांचे मोठे आव्हान आमदार पाटील यांच्यासमोर असणार आहे.
पाचोरा-भडगाव मतदारसंघाची ऐतिहासिक लढत –
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाला मोठा इतिहास असून दिवंगत सुपडू भादू पाटील, के. एम बापू, ओंकार वाघ, आर ओ तात्या यांसारख्या मातब्बर नेत्यांचा वारसा लाभलाय. असे असताना पाचोरा-भडगाव मतदारसंघात एकाही राजकीय नेत्याला आमदारकीच्या निवडणुकीत आतापर्यंत सलग तीन वेळा विजय मिळवता आलेला नाही अर्थात हॅट्रिक करता आलेली नाही. तर दुसरीकडे पहिल्यांदाच एखाद्या प्रमुख पक्षाकडून महिला उमेदवाराला संधी देण्यात आली असल्याने किशोर आप्पा पाटील आणि वैशाली सुर्यवंशी यांच्यात भाऊ विरूद्ध बहिण अशी लढत आहे. दरम्यान, विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांना हॅट्रिक करण्यासाठी किंवा वैशाली सुर्यवंशी यांना महिला आमदार म्हणून निवडून येण्यासाठी इतिहास घडविण्याची संधी असल्याने पाचोरा-भडगाव मतदारसंघाची लढत ऐतिहासिक असणार आहे. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती –
विधानसभा निवडणूक 2024 साठी पाचोरा भडगाव मतदार संघात 12 उमेदवार रिंगणात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर आप्पा पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली सुर्यवंशी, भाजपचे अपक्ष बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अपक्ष बंडखोर उमेदवार तथा माजी आमदार दिलीप वाघ, महाराष्ट्र स्वराज पक्षाचे प्रतापराव पाटील तसेच अपक्ष उमेदवार नीलकंठ पाटील यांच्यात ही लढत रंगणार आहे.
पाचोरा भडगाव विधानसभेत बंडखोरी –
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीत या निवडणुकीत बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांची उमेदवारी कायम राहिल्यामुळे भाजपच्या तिकिटीवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अमोल शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून आव्हान उभं केलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली सुर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले दिलीप वाघ यांनी अपक्ष उमेदवारी केली. यासह भाजपचे नीलकंठ पाटील हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं? –
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली होती. तर दुसरीकडे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आल्याने पाचोऱ्यातून भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले अमोल शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी किशोर आप्पा आणि अमोल शिंदे यांच्यात जोरदार लढत झाली होती. यासोबतच दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली अन् त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
पाचोऱ्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष –
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बहीण विरुद्ध भाऊ अशी लढत होत आहे. तसेच याठिकाणी भाजपचे तालुकाप्रमुख अमोल शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचा अगदी कमी मतांनी पराभव झाला होता. मात्र, या निवडणुकीत देखील त्यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याठिकाणी काट्याची टक्कर होणार आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.
प्रचारातील मुद्दे –
विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांचा त्यांनी केलेल्या विकासकामांवर त्यांचा प्रचार सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची विकासकामे केले असल्याचेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे. तसेच येणाऱ्या काळात पाचोरा-भडगाव हे शिरपुर पॅटर्नपेक्षेही वेगळे असेल अशापद्धतीने कामे केली जाणार असल्याचे आमदार पाटील हे आश्वासित करत आहेत. तसेच येणाऱ्या काळात पाचोरा भडगाव तालुक्यासाठी मंजूर झालेले उपजिल्हा रुग्णालय व एमआयडीसी हे देखील कार्यान्वित होणार असल्याचे आमदार पाटील सांगत आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकीत त्यांच्या विरोधातील उमेदवारांकडून आमदार पाटील यांनी विकासकामे केली नसल्याची टीका केली जात आहे.