जळगाव, 19 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभराहून अधिक काळापासून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी काटेकोरपद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना उद्या मतदान होणार आहे. दरम्यान, काल 18 नोव्हेंबर रोजी प्रचार तोफा थंडावल्यानंतर मतदानाच्या अंतिम तयारीत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपवन संरक्षक जमिर शेख, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन –
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पुर्ण करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्भय वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजवावा. जिल्हा प्रशसनातर्फे सुरळीतरित्या मतदान प्रक्रिया पार पडावी, यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली असून नागरीकांनी स्वयस्फुर्तीने मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती –
विधानसभा निवडणुकीसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्तासह राखीव दलाच्या तुकड्याची दाखल झाल्या आहेत. त्यामुळे 94 मतदान केंद्रांवर राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. तर 133 केंद्रांवर ‘ड्रोन’ची नजर असणार आहे. मतदानावेळी 122 पथकांकरवी गस्त घालण्यात येणार आहे. त्यासाठी सीआरपीएफच्या जवानांसह अन्य राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच ईव्हीएम यंत्रांचा प्रवास पोलीस बंदोबस्तात होणार आहे. अप्रिय घटनेची माहिती मिळाल्यास पोलिस दहा मिनिटात घटनास्थळी पोहोचतील, असे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
जमावबंदी आदेश लागू –
जळगाव भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अनुषंगाने जळगाव जिल्ह्याकरिता मतदान पुर्वीच्या आदल्या दिवसापासुन (दि.18/11/2024 सायंकाळी 6.00 वा. पासुन) ते मतदान संपल्यानंतरच्या एका दिवसापर्यंत (दि.21/11/2024 रात्री 12.00 वा. पावेतो) पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमविण्यावर/एकत्रितपणे वावरण्यावर याव्दारे प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत.
मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या सूचना –
विधानसभा निवडणूकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा याकरिता निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी, अशा सूचना सहाय्यक कामगार आयुक्त डॉ.रा.दे.गुल्हाने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहे. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहणार आहे.
हेही पाहा: प्रचारतोफा थंडावल्या; आता उत्सुकता मतदानाची, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत विशेष संवाद