मुंबई, 9 जानेवारी : येत्या काही दिवसांत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी असल्याचे सांगणारे पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या पोस्टरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त ‘देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मोठी भेट’ देण्यात येणार असून येत्या 14 जानेवारीपूर्वी पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची माहिती –
राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या समाजमाध्यमावरील एक्स पोस्टमध्ये लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीची मोठी भेट मिळणार असून 14 जानेवारी पुर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3000 रूपये जमा होणार आहेत. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, अशी माहिती समाज माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे.
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन घटक पक्षांच्या उमेदवारांकडून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत १४ जानेवारीपूर्वी ३ हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याचे दावे केले जात आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरित केल्यास तो निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरेल का, असा सवाल विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जातोय.






