मुंबई, 5 ऑगस्ट : राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशातच या योजनेच्या बाबतीत काही गैरप्रकारचे प्रकरण देखील समोर आले आहे. काही पुरूषांनी महिलांच्या नावे आपले अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
लाडकी बहिण योजनेसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये बहुतांश महिलांचे अर्ज पात्र ठरले तसेच त्यांच्या बँक खात्यावर लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता देखील प्राप्त झाला. मात्र, काही महिला योजनेसाठी असलेल्या अटी व शर्तींमध्ये न बसल्यामुळे त्यांचे अर्ज अपात्र ठरवले गेले. तसेच त्यांना पुन्हा दुरूस्ती करण्याचा देखील पर्याय देण्यात आला. असे असताना त्याही महिलांचे अर्ज पात्र ठरले.
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार –
मात्र, लाडकी बहिण योजनेसाठी पुरूषांनी महिलांच्या नावे आपले अर्ज दाखल केल्याची प्रकरणे देखील समोर आली आहेत. तर काही ठिकाणी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बायकोचे 26 अर्ज दाखल केल्याचाही धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सप्टेंबरमध्ये येणाऱ्या अर्जांची आता कडक तपासणी –
महिला व बालविकास विभागाने, लाडकी बहीण योजनेसाठी आता मुदत वाढवलेल्या चालू महिन्यात म्हणजेत सप्टेंबर महिन्यामध्ये भरल्या जाणाऱ्या अर्जाची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात या योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल किंवा काही अपडेट करता येईल का जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसेल असा विचार देखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघडकीस –
सातारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकाच महिलेने वेगवेगळ्या प्रकारे अनेक अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील एका महिलेच्या नावे वेगवेगळ्या आधार क्रमांकाद्वारे तब्बल 30 अर्ज दाखल केल्याचा धक्कादायर प्रकार उघडकीस आला. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत चौकशी केली. यानंतर विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधिताच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा : मोठी बातमी! लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?