एरंडोल/जळगाव, 17 जानेवारी : एरंडोलचे प्रांताधिकारी मनीष गायकवाड यांच्यावरील वाळूमाफियांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी पाचोरा येथील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पाचोरा येथील आकाश राजेंद्र पाटील (26), अमोल अरूण चौधरी (32), आणि दादाभाऊ महादू गाडेकर (30) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
उत्राण येथील नदीपात्रात शुक्रवार दि. 12 रोजी रात्री एरंडोलचे प्रांताधिकारी मनीष गायकवाड यांच्यासह महसूल पथकावर वाळूमाफियांनी प्राणघात हल्ला केला होता. त्यांनंतर सर्व गुन्हेगार फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने यापैकी तीन आरोपींना मंगळवारी पाचोरा येथून अटक करण्यात आलेली आहे. त्यांना तत्काळ कासोदा येथे आणण्यात आले.
यावेळी या तीनही जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कासोदा पोलिस ठाण्यात लॉकअपची सुविधा नसल्याने त्यांना एरंडोल पोलिस ठाण्यात रवाना करण्यात आले आहे. त्यांना आज (17 जानेवारी) एरंडोल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
काय नेमकं प्रकरण? –
एरंडोल तालुक्यातील उत्राण शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे पथकासह शुक्रवारी 12 जानेवारी रोजी रात्री अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेले होते. तिथे त्यांना दहा-बारा ट्रॅक्टर्स आढळून आले. पथकाला पाहताच यावरील काही चालकांनी परधाडे गावाच्या दिशेने धूम ठोकली होती. मात्र, काही वाळूमाफियांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, भालगाव मंडळाधिकारी दीपक ठोंबरे, उम्राण तलाठी शकील अहमद शेख, तलाठी विश्वंभर बाळकृष्ण शिरसाठ यांच्यावर हल्ला चढवत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली होती.
हेही वाचा : मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य, निलंबित पोलिस अधिकाऱ्याला 2 दिवसांची पोलिस कोठडी