सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा/जळगाव, 22 जुलै : जळगाव गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करीत पारोळा, पाचोरा व धरणगाव शहरातील बँकांबाहेरून ग्राहकांकडील बॅग अलगदपणे लांबवून लाखोंची रोकड लूटणाऱ्या टोळीतील म्होरक्याला अटक केली आहे. आरोपीकडून तीन लाख 18 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. वसंत बनवारीलाल सिसोदया (30, रा. कडीयागाव, ता. पचोर, जि. राजगढ, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय संपुर्ण बातमी? –
जळगाव जिल्ह्यात बँकेसमोरून व गर्दीच्या ठिकाणाहून पैशांच्या बॅगा लांबवण्यात आल्याने याप्रकरणी गुन्हे शाखेकडून आरोपींचा कसून शोध सुरू होता. काही दिवसांपूर्वी पारोळा गावातील एसबीआय बँकेसमोरून पैशांची बॅग लांबवण्यात आल्यानंतर अज्ञात चोरटे पुन्हा त्याच परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील व पोलीस नाईक भगवान पाटील यांना मिळाली. दरम्यान, त्यांनी ही बाब स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती कळवली.
एलसीबीने रचला सापळा अन् केली अटक –
एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पोलीस नाईक भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील आणि प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने काल रविवार, 21 जुलै रोजी दुपारी दोनवाजता सापळा रचून पारोळा शहरातून संशयित आरोपी बसंत बनवारीलाल शिसोदिया याला अटक केली. त्याच्याकडून तीन लाख 18 हजार रुपयांची रोकड मिळून आली.
चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार –
दरम्यान, त्याने दोन दिवसांपूर्वी पारोळा शहरातील एसबीआय बँक परिसरात रिशी सिंगदर सिसोदिया व विशाल उर्फ मोगली सिसोदिया (दोन्ही रा. गूलखोडी ता.पाचोर, जि. राजगढ) यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, टोळीतील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगून पुन्हा एकदा चोरी करण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. यापूर्वी त्यांनी पाचोरा, धरणगाव आणि जिल्ह्यातील एक इतर परिसरात चोरी केल्याचे देखील सांगितले आहे. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपासार्थ पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.