जळगाव, 29 सप्टेंबर : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या 15 वर्षीय मुलाचा खून करण्यात आल्याची घटना जानेवारी 2022 मध्ये घडली होती. याप्रकरणी मुलाच्या आईला व तिचा प्रियकर प्रमोद जयदेव शिंपी (वय 38 रा. विखरण ता. एरंडोल) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालायत चाललेल्या सुनावणीनंतर प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. तर पुराव्याअभावी मुलाची आईची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मुलाची आई व प्रमोद शिंपी यांच्यात प्रेमसंबंध होते. यानंतर या अनैतिक संबंधांची कुणकुण त्यांच्या मुलाला लागल्याने त्याने याला विरोध दर्शवत हा प्रकार बंद करायला सांगितला. मात्र, दोघांनी याकडे दुर्लक्ष करत मुलालाच त्यांच्या रस्त्यातून हटवण्याचा अर्थात संपविण्याचा कट रचला होता.
प्रेमात अडसर म्हणून मुलाचा खून –
यानंतर रावेर येथे कबुतर ठेवण्याचा पिंजरा घ्यायला जायचे सांगून दोघांनी त्याला मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यातील आसीरगड येथील जंगलात नेत गळफास देऊन ठार मारले व झाडाला मृतदेह लटकवून दोघे जण परतले. दरम्यान, दुसऱ्यादिवशी मुलगा मिळत नसल्याने मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती.
याप्रकरणी प्रमोद शिंपी याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. यानंतर मयत मुलाच्या आईला देखील अटक करण्यात आली होती. तेव्हापासून प्रमोद शिंपी हा कोठडीत होता तर ती महिला जामिनावर होती.
प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा –
हा संपुर्ण खटला न्या. एस.एन. राजूरकर यांच्या न्यायालयात चालल्यानंतर खटल्यादरम्यान एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रमोद शिंपी याचा मित्र, तपासाधिकारी, जळगावचे कोतवाल, मोबाइल सीडीआरविषयी तांत्रिक माहिती देणारे व इतरांची साक्ष महत्वाची ठरली. दरम्यान, न्यायालयाने उपलब्ध पुरावे व साक्ष या आधारे आरोपी प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याप्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी प्रभावी युक्तिवाद केला तर पैरवी अधिकारी म्हणून ताराचंद जावळे यांनी काम पाहिले. तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल वासुदेव मराठे यांनी सहकार्य केले.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview