मुंबई, 25 एप्रिल : पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार असून त्याचा अधिक तपास केला जातोय. यामुळे तात्काळ त्यांनी देश सोडून गेलं पाहिजे. म्हणून कुठल्याही परिस्थितीत व्हिसा रद्द झालेला पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रासह भारतात राहणार नाही, यासाठी प्रशासनाकडून मॉनिटरिंग सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
View this post on Instagram
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाले की, भारत सरकारने जे नागरिक भारतात आहेत. त्यांचा व्हिसा रद्द केलाय आणि त्यांना तात्काळ निघून जायचं सांगितलंय. यासंदर्भात असे कोण-कोण नागरिक महाराष्ट्रात आहेत, याची यादी तयारी झाली असून आम्ही त्याचं आता मॉनिटरिंग करतोय.
तसेच सगळ्या पोलीस स्टेशनला देखील सांगण्यात आलं असून तात्काळ वेळेत त्यांनी देश सोडून गेलं पाहिजे. यादृष्टीने पुर्णपणे मॉनिटरिंग केलं जाईल आणि यामध्ये कोणी दिरंगाई केली तर त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत व्हिसा रद्द झालेला पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रासह भारतात राहणार नाही, यासंदर्भात आम्ही पुर्णपणे काळजी घेत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना –
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून मोठी पावले उचलण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर विविध बैठकांचं सत्र पार पडत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधला. यावेळी पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे आदेश दिले असून ‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि तात्काळ परत पाठवा’, अशा सूचना अमित शाह यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.