संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 11 सप्टेंबर : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पारोळा तालुक्यातील दळवेल शिवारातील विहिरीत काही दिवसांपूर्वी अज्ञात टँकर चालकाने रासायनिक द्रव्य टाकल्याची घटना घडली होती. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. दोन वर्षांपूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. दरम्यान, याबाबत तक्रार करुनही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी 10 सप्टेंबर सकाळी अकराच्या सुमारास दळवेल येथे रास्ता रोको आंदोलन केले.
काय आहे संपुर्ण बातमी? –
पारोळा तालुक्यातील दळवेल शिवारात अज्ञातांच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने गावाजवळ महामार्ग क्रमांक 53 वर ग्रामस्थांनी सकाळी 10 वाजता रास्ता रोको करून वाहतूक बंद केली होती. परंतु पारोळा पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.
हेही पाहा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?
अन् आश्वासनानंतर रास्ता आंदोलन मागे –
पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, अभिजित पाटील, किशोर भोई, सुनील हटकर यांनी घटनास्थळावर जाऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना समजावून यातून लवकरात लवकर मार्ग काढू, असे पोलिसांनी आश्वासित केले. त्यामुळे हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. दरम्यान, शेतीचे नुकसान करणाऱ्या टॅंकरचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय? –
दळवेलकडून पारोळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेतकऱ्यांच्या शेतजमिनींमध्ये आणि नाल्यात अज्ञात व्यक्तीकडून विषारी रसायने टाकली जात असल्याचा प्रकार वारंवार आढळून येत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांनी 4 रोजी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदन देत आठ दिवसांत होत असलेल्या गंभीर प्रकाराबाबत चौकशी करून आरोपीस अटक करावी, अशी मागणी केली होती. परंतु सदर प्रकरणाबाबत आरोपी न सापडल्याने गावकऱ्यांनी रास्ता रोको केला होता.
हेही पाहा : Video : ओळख प्रशासनाची, प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?