मुंबई, 23 मे : एकीकडे उन्हाळ्याचे दिवस असताना राज्यात हवामानाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. मे महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतीपिकांचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा –
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून वाऱ्याचा वेग काही भागांत 60 किमी/ताशीपर्यंत पोहोचू शकतो.
मच्छीमारांसाठी सावधानतेचा इशारा –
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश परिस्थिती निर्माण झालीय. यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमारांना सतर्कतेचा तसेच समुद्रात न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच मच्छीमारांनी नौका पुढील दोन दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे.
जळगावचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज सकाळपासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.