चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर, 13 डिसेंबर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी जळगाव महापालिकेच्या गाळेधारकांचे भाडेपट्टा कर संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली. दरम्यान, जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील 2 हजार 368 गाळेधारकांचा भाडेपट्टा नुतनीकरण नियमानुसार करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी विधानसभेत दिली.
आमदार सुरेश भोळे काय म्हणाले? –
विधानसभेत बोलताना आमदार सुरेश भोळे म्हणाले की, जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील तब्बल 2 हजार 368 गाळेधारकांशी संबंधित हा प्रश्न 2012 सालापासून प्रलंबित आहे. भाडेपट्टा नूतनीकरण व भाडेपट्टा कर मूल्यांकनाचे दर 2 किंवा 3% प्रमाणे आकारणे आणि हे नवीन दर मुदत संपल्याच्या कालावधीपासून लागू न करणे, यासंदर्भात राज्य शासनाची सकारात्मक भूमिका आहे. यांसंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानता केवळ अधिकारी स्तरावर याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत आमदार भोळे यांनी विधानसभेत व्यक्त केली.
राज्यमंत्री माधुरी मिसाळी यांनी दिली महत्वाची माहिती –
दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, या गाळेधारकांच्या भाडेपट्टयांच्या नुतनीकरणाबाबत भाडे व सुरक्षा ठेव निर्धारण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने भाडेपट्टा दर निश्चित केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दर दोन किंवा तीन टक्के करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे जळगाव महापालिकेने कार्यवाही केली असून त्याचा अहवाल शासनास प्राप्त झाला असल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.






