मुंबई, 8 फेब्रुवारी : राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आले आहे. तत्पूर्वी, राज्यपाल रमेश बैस यांनी डिसेंबरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याच्या सूचना केली होती.
राज्य सरकारचा मोठा निर्णय –
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरविण्याची वेळ सकाळी 9 वाजेच्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी, असे शासन परिपत्रकात म्हटले आहे. हा आदेश 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.
शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा-2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
शासन परिपत्रकात काय म्हटलंय? –
राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळी विशेषतः खाजगी शाळा भरण्याचा वेळा या साधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचे दिसून आले. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतान दिसून येत आहे.
पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात. तसेच विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण न झाल्याने याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होत आहे. सकाळी लवकर उठल्याने बदलत्या वातावरणामुळे देखील विद्यार्थी आजारी पडतात. सकाळी शाळेत जाण्यासाठी लहान मुलांची तयार करण्यासाठी पालकांची ओढाताण होते. यामुळे पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरविण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र हा गुन्हेगारीच्या वाटेवर जाताना दिसतोय, चाळीसगावातील गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्रवादीची टीका