जळगाव, 6 जानेवारी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयं-सहायता समूहांच्या तयार वस्तूंना कायमस्वरूपी व हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यात “उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र)” स्थापन करण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 13 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून नाशिक विभागातून फक्त जळगाव जिल्ह्याला जळगाव व भुसावळ या दोन ठिकाणी “उमेद मॉल” स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यात या पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी बहिणाबाई मार्टची स्थापना करण्यात आली आहे. जळगाव शहरातील कोंबडी बाजार परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या अल्पबचत संकुलात बहीणाबाई मार्ट सुरू करण्यात आला आहे.
जळगाव व भुसावळ येथे होणार “उमेद मॉल” ची स्थापना –
शासनाच्या अध्यादेशानुसार जळगाव जिल्ह्यात जळगाव व भुसावळ या ठिकाणी “उमेद मॉल” उभारण्यात येणार असून, यामुळे महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.
महिलांच्या उत्पन्नवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी –
महिला स्वयं-सहायता समूहांकडून तयार होणारे खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, गृहउपयोगी साहित्य, कपडे, स्थानिक उत्पादने आदी वस्तूंना विक्रीसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ मिळणार आहे. या माध्यमातून महिलांच्या उत्पन्नवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने दिनांक २३ जुलै २०२५ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, जळगाव जिल्ह्यास मिळालेली ही मान्यता जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.






