संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 28 एप्रिल : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित केलेली “मंगल कलश रथयात्रा” दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी मुक्ताईनगर येथून भव्य आणि दिव्य स्वरुपात प्रारंभ झाली. ही यात्रा पक्षाच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय बांधिलकीचे प्रत्यक्ष दर्शन घडवत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगून, विविध गावागावातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा उद्देश या यात्रेमागे आहे.
भव्य सहभाग व संघटनेची सुसंगत ताकद- ह्या यात्रेत डॉ संभाजीराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारोळा तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. यावेळी मंगल कलश रथ यात्रेची मिरवणुकीची सुरुवात पारोळा बायपास येथुन डि.जे.व ढोल ताशांच्या गजरात पारोळ्यात श्री साई हॉस्पिटल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे पोहचली.
मा.मदत,पुनर्वसनमंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, तथा अमळनेर विधानसभेचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, रावेर ग्रामीण कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, उत्तर महाराष्ट्र युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे, सह जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य सहभागी होते. संघटनेचा उद्देश आणि दृष्टीकोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासाचा मार्ग अवलंबला आहे.
यात्रेचा संदेश – महाराष्ट्राची एकता व अखंडतेचा सन्मान, सर्व जाती, धर्म, पंथांना समान वागणूक देणे, जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणे, ग्रामीण व शहरी भागात संवाद व विश्वास वाढवणे, संघटनात्मक बळकटता साधणे आणि नवचैतन्य निर्माण करणे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ठाम विश्वास व्यक्त केला की “ही यात्रा केवळ धार्मिक वा राजकीय कार्यक्रम नसून, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक आहे.
उत्तर महाराष्ट्रात नवसंजीवनी फुंकणारी ही यात्रा जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नव्या विश्वासाचा संचार करेल,” असा ठाम विश्वास डॉ संभाजीराजे पाटील यांच्या वतीने नागरिकांना व पदाधिकाऱ्यांना देण्यात आला.