जळगाव, 10 जुलै : शेतकरी तसेच विविध घटकांच्या विविध समस्यांसंदर्भातील मागण्यांसाठी महाविकासआघाडीच्यावतीने आज 10 जुलै रोजी सकाळी दहा वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन –
जळगाव जिल्ह्यात शेतकरी तसेच विविध घटकांच्या विविध समस्या, अडचणी मागण्यासंदर्भात वेळोवेळी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन तसेच तोंडी, लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन देखील अद्याप शेतकरी बांधवांच्या मागण्या संदर्भात शासनाची बोटचेपी भूमिका असल्याने शेतकरी त्रस्त झाला असून बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उद्या 10 जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनातील चार प्रमुख मागण्या –
1) दुधाला रू.30/- प्रति लिटर भाव व रू.5/- प्रति लि. चा फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. यामध्ये जळगाव जिल्ह्यात मागील कालावधीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेले प्रस्तावांना देखील रु.5/- प्रति लिटर चे अनुदान मंजूर करावे.
2) जळगाव जिल्ह्यातील 6686 केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळी पिक विमा नुकसान भरपाई शासनाने नाम मंजूर केलेले असून याबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंतिम अधिकार असलेल्या मा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पिक विमा तक्रार निवारण समितीने मंजुरी देऊन देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाबाबत तात्काळ नुकसान भरपाई मंजूर होणे बाबत.
3 ) जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेला अनुदान कुठलेही निकष न लावता सरसकट सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे.
4) शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केलेल्या असून परंतु त्याचा लक्षात कमी असल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होत नाही तसेच ज्वारी साठवणे साठी गोदाम उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी होऊ शकत नाही असे उत्तर मिळत असल्याने तात्काळ सरसकट ज्वारी खरेदी सुरू करावी.
वरील मागण्या मान्य होईपर्यंत जळगाव जिल्हा महाविकास आघाडीचे सर्व नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी शेतकरी संघटना समविचारी पक्ष आणि संस्था धरणे आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन संपुष्टात येणार नाही असा निर्धार केला असून कुंभकर्णी झोप घेत राज्य शासनाला वठणीवर आणण्यासाठी एल्गार पुकारला असल्याची माहिती उन्मेश पाटील यांनी दिली.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा