नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होऊन आज पाच दिवस उलटल्यानंतरही राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न कायम आहे. विधानभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले. तरीदेखील मुख्यमंत्रीपदाबाबतचा मुद्दा प्रलंबित आहे. दरम्यान, आज राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. यानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
युट्यूब चॅनल लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठक –
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. याआधी सकाळीच अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, आज रात्री 9 वाजेच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीबाबत बैठक पार पडणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत तसेच आगामी काळात मुख्यमंत्री कोण असेल तसेच मुख्यमंत्री निवडीचा परिणाम काय असेल, आदी मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. यानंतर कदाचित महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुख्यमंत्री भाजपचाच –
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल त्यांची मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचाच होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. यानुसार, देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी द्यायची की नवीन कोणी चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी द्यायचा, याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व आखणी करत आहे. याचाच एक भाग म्हणून आज अमित शहा यांची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसोबत देखील बैठक पार पडलीय. दरम्यान, राज्यातील जनतेला नव्या मुख्यमंत्र्यांचे वेध लागले असून मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत काय निर्णय होणार?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.